परवा एका मित्राकडे गेलो असता त्याचा मित्र व त्या मित्राचा मुलगा दोघे त्याच्याकडे आले होते . १२वीच्या परीक्षेत मुलाला चांगले गुण मिळतील कारण १०वीला त्याला ९६% गुण मिळाले होते. तसेच त्याने दोन्ही ग्रुप घेवून १२वीची परीक्षा दिलेली आहे. आमच्या नातेवाईकामध्ये बरेचण वैद्यकीय पेशामध्ये आहेत त्यामुळे त्यालाही डॉक्टरच करायचे आहे . NEET परीक्षेत देखील उत्तम गुण मिळतील अशी आशा आहे. अशी त्या पाल्याबाबतची माहिती सांगितली . माझ्या मित्राने विचारले मग अडतय कुठे ?
माझ्या मित्राने सल्ला दिला की, डॉक्टरच व्हायच असेल तर काहीच अडचण दिसत नाही . समजा NEET मध्ये थोडे कमी गुण मिळाले तरी Non grant ला प्रवेश मिळेल त्यातही नाही मिळाला तर Deemed University मध्ये संधी आहेच . पालकही थोडे विचार करीत होते . त्यांनी थोडी वेगळीच अडचण सांगितली . " मुलगाच मेडिकल नको म्हणतोय " त्याला तुम्ही समजावून सांगा . मुलाला विचारले तर तो म्हणाला ' " काका मला रक्त बघितले तरी उलटी होते , एकदा तर अपघात बघून मलाच चक्कर आली होती " . त्यामुलापेक्षा पालकांना आपल्या पाल्याने मेडिकलला जावे असे वाटत होते. पालकाचे म्हणणे इतकी चांगली बुधिमत्ता विनाकारण फालतू कोर्स करून वाया घालवायची कां?
अशावेळी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करताना खूप काळजी घ्यावी लागते . बऱ्याच वेळा शालेय परीक्षेतीलच नव्हे तर बोर्डाच्या परीक्षेतील गुण हे काही बुद्धिमत्तेचे निदर्शक ठरत नाही.काहीवेळा खूप बुद्धिमता असली तरी पालकांची आर्थिक परिस्थिती देखील विचारात घ्यावी लागते . काहीवेळा असे होते की ' पालकांची आर्थिक स्थिती लक्षात घेतली नाही तर पाल्याच्या शिक्षणाचा खर्च भागविताना कुटुंबाची खूपच ओढाताण होते किंवा दुसऱ्या मुलाच्या शिक्षणावर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो .तसेच विद्यार्थ्यांची आवड , कोर्सची उपलब्धता , कोर्स केल्यानंतर त्या कोर्सची उपयुक्तता , विदयार्थ्याची आरोग्य स्थिती , काही कोर्सेस किंवा व्यवसाय काही शारीरिक आजाराला निमंत्रण देवू शकतात . ज्यांना दम्या सारखा विकार आहे. त्यांना दमट हवेच्या ठिकाणी असणारी नोकरी करणे त्रासदायक ठरू शकते . एखाद्मा कोर्सचे किंवा व्यवसायाच्या ठिकाणचे हवामान विद्यार्थ्याच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम करू शकते . उदा. IT क्षेत्रात काम करणाराला जास्तीत जास्त काळ AC मध्ये काम करावे लागते , काहीना AC तब्येतीला त्रासदायक ठरू शकतो .विद्यार्थ्यांची आपल्या घराशी व कुटुंबाशी नाळ घट्ट जुळलेली असेल तर अशा विद्यार्थ्याला घरापासून दूर अंतरावरील कोर्स करणे किंवा नोकरी करणे कठीण जाते. Navy मधील कित्येक मुले चांगल्या Position च्या नोकऱ्या सोडून घरी आलेली
मी स्वतः पाहिलेली आहेत .
काही कोर्सेस किंवा व्यवसाय देखील ठराविक ठिकाणीच उपलब्ध असतात. विशिष्ट शिक्षण घेवून तेथे कायम स्वरूपी राहण्याची तयारी असणार आहे का? उदा . शेती सारखा व्यवसाय खेड्यात असणार आहे आपण जर कृषिविषयक कोर्स केला तर आपली ग्रामीण भागात राहण्याची तयारी असायला हवी !
काही व्यवसायात बोलण्यात प्रभुत्व असायला हवे असते पण जर विद्यार्थ्याचा स्वभाव अगदीच अबोल असेल तर त्याला सेल्समन साठीच्या कोर्ससाठी MBA करण्यासाठी सल्ला देणे अयोग्य ठरते .
मुलींच्या बाबतीत आणखी काही वेगळेच मुद्दे विचारात घ्यावे लागतात . आपण जो कोर्स करणार आहोत तो पूर्ण केल्यावर कामाच्या ठिकाणी shift पद्धती असली तर आपणास चालणार आहे कां? आपल्या दृष्टीने करिअर महत्त्वाचे असणार आहे कां कुटुंब याचाही विचार करावा लागतो .
याचा अर्थ असा की, करिअर मार्गदर्शन करताना उमेदवाराचे शालेय गुण विचारात घेवून चालत नाही तर उमेदवाराची शालेय गुणवत्ता , अभिरुची , त्याचा स्वभाव , त्याचे आरोग्य , आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक व सामाजिक परिस्थिती, त्याच्या भोवतीचे सांस्कृतिक वातावरण अशा अनेक अंगाने व्यवसाय मार्गदर्शन किंवा कोर्सेस निवडण्यासाठीचे मार्गदर्शन करताना विचार करावा लागतो .
डॉ ह.ना. जगताप
दि. १८ / ४ / २०२५









