सोमवार, २२ एप्रिल, २०१९

*संवेदनातंतूंचे जाळे*

📙 *संवेदनातंतूंचे जाळे* 📙
**************************

पृष्ठवंशीय प्राण्यांच्या शरीरात संवेदनातंतूंचे जाळे सर्वत्र पसरलेले असते. मेंदू डोक्यातील कवटीच्या भागात संरक्षित असून तेथून मणक्यामार्फत मज्जारजू जातात. या मज्जारज्जूंपासून सर्व शरीरभर संवेदनातंतुंचे जाळे पसरत जाते. या संवेदनातंतूंची काही प्रमुख वैशिष्ट्ये लक्षात घेतली तर या अत्यंत क्लिष्ट जाळ्याबद्दल बराचसा खुलासा आपोअाप होत जातो.

शरीरातील अन्य प्रकारच्या पेशी सूक्ष्म असतात, परंतु मज्जापेशी खूप मोठ्या असू शकतात. अशा मज्जापेशी संवेदना गोळा करणाऱ्या व आज्ञावाहक अशा दोन प्रकारच्या असतात. प्रत्येक मज्जापेशीपासून मज्जातंतू निघतात. मज्जातंतूंची लांबी खूपच मोठी म्हणजे एक मीटर इतकीही असू शकते. संवेदनाग्राहक मज्जापेशी त्वचेकडून, स्नायुंकडून मिळणाऱ्या संवेदना मज्जातंतूद्वारा मेंदूकडे पाठविण्याचे काम करतात. आज्ञाग्राहक पेशी या संवेदनांप्रमाणे योग्य त्या आज्ञांचे संदेश मज्जातंतूंद्वारे स्नायूंकडे पाठवतात. हे संदेशवहन फक्त एकाच दिशेने होत असते.

मज्जापेशींची शरीरातील संख्या कायम असते. त्यांचे पुनरुत्पादन कोणत्याही पद्धतीने होत नाही. याचा अर्थ काही कारणाने जर काही पेशी मृत झाल्या, तर त्यांचे कार्य तिथेच थांबते. याच कारणाने मज्जाघाताने एखादा अवयव जर दुर्बल झाला, त्याची हालचाल थांबली, तर ती कायमची थांबते. याचप्रमाणे संवेदनाग्राहक मज्जापेशींत काही बिघाड झाला, तर तो परिणाम कायमचा होऊन तेवढ्या भागापुरती बधिरता येते. पहिले उदाहरण म्हणजे मणक्याला झालेल्या अपघातात त्याखालील भागातील अाज्ञावहन थांबते, परिणामी हालचाल थांबते. दुसरे उदाहरण म्हणजे कुष्ठरोगाचे. यात ठराविक भागातील संवेदनावहन थांबते व तो भाग बधिर राहतो; पण हालचाली कायम असतात.

संवेदनाग्रहण व संवेदनावहन करणारे विशिष्ट तंतू विविध वेदनांत फरक करतात. टोचणे, गरम वस्तूमुळे भाजणे, पिळवटणे या वेदनांतील फरक केला जातो. हा फरक व यांतील सूक्ष्म छटा शरीराच्या भागानुसार बदलतात. दोन टाचण्या टोचताहेत की एक, हे अंतरानुसार व शरीराच्या भागानुसार बदलत जाते. काही औषधांचा परिणाम म्हणून संवेदना तात्पुरत्या नष्ट करता येतात; पण गमतीचा भाग म्हणजे कापलेले, टोचलेले समजत नसले, तरी तेथे भाजलेले समजते. काही औषधे मेंदूतील ग्रहणशक्तीच बधिर करून संवेदना ग्रहण करणे थांबवतात. या प्रकारालाच पूर्ण भूल देणे असे आपण म्हणतो. पण अशा पूर्ण भूल दिलेल्या अवस्थेत शरीराच्या स्नायूंना विद्युतलहरींद्वारे संदेश देता येऊन त्यांचे आकुंचन वा प्रसरण होऊ शकते.

शरीरातील सर्व मज्जापेशी विद्युतलहरींद्वारे संदेशग्रहण वा वहन करतात. अर्थातच हे संदेश पाठवले जात असताना विजेच्या तारांना जसे आवरण असते, तसेच आवरण मज्जातंतूंना असते. त्यालाच 'मायलिन शीथ' असे म्हणतात. मज्जातंतूंचा एकत्र जुडगा जरी बांधला, तरी त्या संदेशांच्या बाबतीत 'शॉर्टसर्किट' होत नाही, ते त्यामुळेच.

असे हे संदेश देणारे व घेणारे संवेदनातंतूंचे जाळे साऱ्या शरीरभर पसरलेले असल्यानेच संपूर्ण त्त्वचा हेही पंचेंद्रियांतील एक इंद्रिय मानले गेले आहे.

*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

शनिवार, २० एप्रिल, २०१९

माझ्या हेल्थ-सायन्स या पेजवर आपले स्वागत.

या पानावर आपण आपल्या दैनंदिन जीवनातील आरोग्यविषय विषयक समस्या व त्यावर काही उपाय अशी शृंखला चालवत आहोत.
आज केस गळणे याबद्दल समजावून घेऊया.

💠 केस गळण्याच्या समस्यामधे केस विरळ होणे ते पूर्ण टक्कल पडणे यांचा समावेश असतो. केस अनेक कारणांमुळ गळू शकतात. वैद्यकीयदृष्ट्या, केस गळणे हे अनेक श्रेणींमधे विभागता येते, त्यामधेः
1. दीर्घकाळ चाललेला आजार, मोठी शस्त्रकीया किंवा गंभीर संक्रमण यांसारख्या प्रमुख शारीरिक तणावानंतर दोन ते तीन महिन्यांत केस गळणे ही सामान्य स्थिती आहे. संप्रेरकांच्या पातळीत अचानक बदल होणे, विशेषतः महिलांमधे प्रसुतिनंतर असा बदल होण्यानं केस गळतात. मध्यम प्रमाणात केस गळतात परंतु मोठ्या प्रमाणात चट्टे पडणे हे दुर्मिळ आहे.
2. औषधांचे दुष्परिणाम : ठराविक औषधांच्या दुष्परिणामांमुळं केस गळू शकतात आणि अचानक केस गळून संपूर्ण डोके प्रभावित होऊ शकते.
3. एखाद्या वैद्यकीय आजाराचे लक्षण – थायरॉईड समस्या (जसे हायपोथायरॉईडीझम किंवा हायपरथायरॉईडीझम), लैंगिक संप्रेरकांचं असंतुलन किंवा एखादा गंभीर पोषणात्मक आजार, विशेषतः प्रथिनं, लोह, जस्त किंवा बायोटीन यांची कमतरता अशा प्रकारच्या वैद्यकीय आजारांमुळं केस गळणे हे एक लक्षण दिसू शकते. मर्यादित आहार घेणारे लोक किंवा ज्या स्त्रियांना अतिप्रमाणात मासिक स्त्राव होत असेल त्यांना या कमतरता अधिक प्रमाणात दिसून येतात.
4. टकलावर बुरशीचं संक्रमण – ठराविक प्रकारच्या बुरशीमुळं टकलावर संक्रमण होतं त्यामुळं केस गळून चट्टे पडतात. मुलांमधे असे केस गळून चट्टे पडणं सामान्य आहे.
5. अनुवांशिक पध्दतीनं टक्कल पडणे – पुरुषांमधे, केस गळण्याची पध्दत विशिष्ट प्रकारे होते (डोक्याच्या शीर्षभागापासून केस गळायला किंवा पातळ व्हायला सुरुवात होणे). सामान्यतः अशाच प्रकारे केस गळतात, आणि पुरुषाच्या आयुष्यात कोणत्याही वयात त्याची सुरुवात होऊ शकते, अगदी त्याच्या पौगंडावस्थेत देखील. असे साधारणतः तीन घटकांच्या आंतरक्रियेमुळं होतं टक्कल पडण्याची अनुवांशिक धारणा, पुरुषी संप्रेरक आणि वाढतं वय. स्त्रियांमधे, डोक्याचा वरचा संपूर्ण भाग किंवा चोटीचा भाग विरळ होऊ शकतो, फक्त कपाळावरचा भाग सोडून.

💠 लक्षणे
आपण सामान्यतः दररोज टकलावरचे 50 ते 100 केस गमावतो. केस यापेक्षा अधिक प्रमाणात गळत असतील तर ते चिंतेचं कारण आहे. आपल्याला असंही लक्षात येईल की केस हे साधारणतः पातळ होऊ लागले आहेत आणि एक किंवा अधिक टकलाचे चट्टे दिसू लागले आहेत.

💠 प्रतिबंध
तणाव कमी करुन, चांगला आहार घेऊन आणि विचारपूर्वक हेयरड्रेसींगचं तंत्र वापरुन, आणि शक्य झाल्यास, केसगळती न होऊ देणारी औषधं घेऊन काही प्रकारची केसगळती ही टाळता येऊ शकते. बुरशीच्या संक्रमणापासून होणारी केसगळती ही केस स्वच्छ ठेवून आणि आपली टोपी, कंगवे किंवा ब्रश इतरांसोबत न वापरुन टाळता येऊ शकते. अनुवांशिक पध्दतीनं येणारं टक्कल काहीवेळा औषधांनी टाळता येऊ शकतं.

https://www.facebook.com/Health-Science-347238442564441/
👆🏼या पेजला लाईक करा आणि मिळवा रोजच्या रोज आरोग्यविषयक माहिती.

whatsapp वर रोजच्या रोज माहिती मिळविण्यासाठी 7020404091 या नंबरवर 'Request' टाइप करुन *(फक्त whatsapp वरच)* पाठवा.

शुक्रवार, १९ एप्रिल, २०१९

अमेरिकेने प्रवेश नाकारल्यानंतर थेट अमेरिकेमध्येच स्वत:ची कंपनी सुरू करणारा मराठी उद्योजक


प्रथमेश कोरगांवकर या आपल्या उद्योजक मित्राची गोष्ट अनेक नवउद्योजकांना बरंच काही शिकवणारी आहे. प्रथमेशचा उद्योजकीय प्रवास हा रंजक तर आहेच, तसाच तो आव्हानात्मक आणि अनेक अडचणींनी भरलेलाही आहे. या नव्या पिढीच्या आणि नव्या दमाच्या या उद्योजकाचा आत्मविश्वास त्याला या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी सदैव तयार ठेवतो. प्रथमेशच्या तीन कंपन्या आहेत. या तीनही कंपन्या सेवा क्षेत्रात कार्यरत आहेत. कंपनीचे मूळ उद्दिष्ट हे प्रत्येक ग्राहकाला ‘डिजिटल मार्केटिंग’द्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे हे आहे. नाशिक, पुणे आणि अमेरिकेतील डेलावेर येथे प्रथमेशच्या कंपनींची कार्यालये आहेत. लहान वयात एवढा मोठा पल्ला गाठणार्‍या प्रथमेशचा प्रवास खूप काही शिकवणारा आहे. मूळचा नाशिककर असलेल्या प्रथमेशचे शिक्षण पुण्यातील आळंदी येथे झाले. तो आयटी इंजिनिअर झाला. त्याला लहानपणापासून कॉम्प्युटरची आवड होती. सहावीत असताना कॉम्प्युटर पाहिला आणि प्रथमेश म्हणतो मला त्याचे वेडच लागले जणू. त्याचवेळी ठरवले आपले करिअर कॉम्प्युटरमध्येच करायचे. लहानपणी माझा आदर्श ‘बिल गेट्स’ होते. त्यातूनच मी उद्योजक व्हायचे मनाशी पक्क केलं. पुढे कॉलेजमध्ये असताना ‘पायरेट्स ऑफ सिलिकॉन व्हॅली’ हा चित्रपट पाहिला आणि त्या चित्रपटानुसार बिल गेट्स यांनी स्टिव्ह जॉब्स यांची संकल्पना चोरून ती जगासमोर आणली असे होते. त्यातच स्टिव्ह जॉब्स यांचे कार्य, त्यांची कल्पनाशक्ती, त्यांच्या आयुष्यातील चढउतार हे माझ्यासाठी खूपच प्रेरणादायी ठरत गेले आणि त्यावेळेपासून माझा आदर्श हे ‘स्टिव्ह जॉब्स’ झाले. प्रथमेशला लहापणापासूनच चौकटीत काम करायला आवडत नसे. आपण जगाच्या पाठीवर कोठेही असलो तरी आपल्याला आपला उद्योग चालवता आला पाहिजे हे त्याचे स्वप्न होते. त्याचे म्हणणे आहे की आपण उद्योगातही नोकरीसारखेच काम करत राहिलो तर एक उद्योजक आणि नोकरदार यात फरक तो काय? पुण्यात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना प्रथमेशने पहिला उद्योग केला. आपल्या चार मित्रांना सोबत घेवून त्यांनी स्वत:ची सोशल मिडीया नेटवर्किंग वेबसाइट सुरू केली. त्या वेबसाइटचे नाव होते slamdiary.com आपल्या मित्रांचे वाढदिवसाचे नोटिफिकेशन एसएमएसद्वारे कळवण्याचे फिचर या वेबसाइटमध्ये होते. चार मित्रांनी यात आर्थिक गुंतवणूक केली होती आणि पहिल्याच दिवशी ती वेबसाइट हॅक झाली. ती वेबसाइट पुन्हा सुरू करायची तर ‘ट्राय’ने बल्क एसएमएसच्या नियमात बदल केला आणि एसएमएसचे दरही वाढवले. अशाप्रकारे प्रथमेश आणि त्याच्या मित्रांचा पहिला व्यवसाय पूर्णपणे यशस्वी होऊ शकला नाही. अशाप्रकारे वेबसाइट सुरू करण्यात प्रथमेशचा पुढाकार होता आणि त्याच्यामुळे मित्रांचे आर्थिक नुकसान झाले, परंतु त्यांच्यापैकी एकानेही त्याला कधीही त्याविषयी टोकले नाही अथवा दोषही दिला नाही. प्रथमेश म्हणतो, “त्याचमुळे माझ्यातील उद्योजकीय महत्त्वकांक्षेला तडा न जाता ती अजून घट्ट झाली. माझ्या संपूर्ण उद्योजकीय प्रवासात माझे कुटुंब, आई वडील, माझे मित्र, माझे मामा, माझी पत्नी ह्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजिमध्ये इंजिनीरिंग केल्यानंतर मोठ्या कंपन्यांमध्ये कार्यप्रणाली कशी असते हे जाणून घेण्यासाठी मी काही वर्ष नोकरी करण्याचा निर्णय घेतला. कॉलेज कॅम्पसमध्ये झालेल्या प्लेसमेंटमधील कॉग्निझंट कंपनीची नोकरीची ऑफर मी स्वीकारली. दोन वर्षे ‘कॉग्निझंट’मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून नोकरी केली. कंपनीत काम करताना तिथे एक कार्यप्रणाली होती त्यानुसार कॉम्प्युटरमध्ये लॉगइन करण्यासाठी आम्हाला डिजिटल टोकन दिले जाई. त्यातील पासवर्ड सतत बदलत असे. पासवर्डशिवाय आम्ही आमच्या कॉम्प्युटरला लॉगइन करू शकत नव्हतो. अशात मी महिन्यातून दोनदा तरी माझे टोकन घरी विसरायचो. यातूनच मला एक संकल्पना सुचली. जर आपण आपले डिजिटल टोकन, क्रेडिट कार्ड, गाडीची डिजिटल चावी ह्या सगळ्या गोष्टी एका घड्याळ्यात सेव करू शकलो तर? कारण घड्याळ ही अशी गोष्ट आहे जी बहुतांश आपल्या सर्वांकडे असते. मी त्यावर अभ्यास सुरू केला आणि त्यातूनच २०१३ साली मी भारतात आणि अमेरिकेमध्ये माझ्या संशोधनाचे पेटंट फाईल केले. पुढल्या प्रवासाविषयी सांगताना प्रथमेश म्हणतो कॉग्निझंटमध्ये काम करत असताना माझा एक मित्र होता मयुरेश जाधव. एक दिवस तो मला म्हणाला मी आता नोकरी सोडून स्वत:चा उद्योग सुरू करतोय. त्यासाठी मला तुझी साथ हवीय. माझी कॉग्निझंटमधील नोकरी नवीनच होती त्यामुळे मी त्याला नोकरी सांभाळून अर्धवेळ तुला सहकार्य करू शकेन असे सांगितले. आम्ही दोघांनी मिळून ‘सबसिस्ट सर्व्हिसेस’ म्हणून सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची कंपनी सुरू केली. इथून खर्‍या अर्थाने माझ्या उद्योजकीय प्रवासाला सुरुवात झाली. २०१४ साली कॉग्निझंट कंपनी सोडली आणि त्याने संशोधनासाठी फंडिंग गोळा करण्याच्या कामास सुरुवात केली. यासाठी दीडशेपेक्षा जास्त भारतीय गुंतवणूकदारांशी संपर्क साधला. माझी संकल्पना ही हार्डवेअरशी संबंधीत होती. त्यामुळे यासाठी आवश्यक भांडवलही तेवढेच मोठे होते. माझी ही एक संकल्पना होती त्या संकल्पनेच्या संशोधनावर पैसे लावण्यास कोणीही तयार नव्हते. तो म्हणतो, आपल्याकडे भारतीय गुंतवणूकदार हा केवळ व्यावसायिक आहे त्याला त्याच्या गुंतवणूकीचा केवळ परतावा हवा. यासाठी पाश्चिमात्त्य देशातील एखाद्या कंपनीची हुबेहुब कॉपी करून सुरू केलेल्या व्यवसायावरही तो पैसा लावतो, परंतु नवीन संकल्पनेवर पैसे लावताना हात आखडता घेतो. याचमुळे मी माझा मोर्चा पाश्चिमात्य गुंतवणूकदारांकडे वळवला. भरपूर लोकांनी माझ्या संकल्पनेचे कौतुक केले. सुप्रसिद्ध उद्योजक आणि गुंतवणूकदार विनोद खोसला यांनी माझे हे पेटंट विकत घेण्यात रूचीही दाखवली, परंतु माझे पेटंट हे अजूनही माझ्या नावाने मिळालेले नाही. पेटंट मिळण्यासाठी भारतात पाच वर्षाचा कालावधी तर अमेरिकेत तोच तीन वर्षांचा कालावधी लागतो. भारतात पेटंट टाकून आता सहा वर्ष होत आली तरीही भारतातून माझे पेटंट अजून सिद्ध झाले नाही. अमेरिकेत भारतात फाईल केल्यांनतर सहा महिन्यांनी आपण तेच पेटंट नोंदवू शकतो. मागून नोंदवूनसुद्धा अमेरिकेने ठरलेल्या वेळेनुसार तीन वर्षात माझे पेटंट माझ्या नावावर सिद्ध केले. अजूनही मी माझ्या भारतातील पेंटन्ट मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे आणि त्यासाठी लढतो आहे. एक गुंतवणूकदार कंपनी माझ्या निदर्शनास आली जी अमेरिकेतील उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना अमेरिकेत स्वतःची कंपनी सुरू करण्यासाठी मदत करते. मी कंपनीशी संपर्क केला. जर तुम्ही अमेरिकेत विद्यार्थी असाल तर आम्ही तुमच्या संकल्पनेचा विचार करू, असे आश्वासन त्यांच्याकडून दिले गेले. त्यामुळे मी डिसेंबर २०१५ साली अमेरिकेला उच्च शिक्षणासाठी गेलो. अमेरिकेकडून प्रथमेशचा नामंजूर झालेला व्हिसा कॅलिफोर्नियामधील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना माझे अमेरिकेतील माझे पेटंट माझ्या नावावर रजिस्टर झाले. चार महिन्यांचे एक सेमिस्टर पूर्ण झाल्यावर माझ्या बहिणीच्या लग्नासाठी मी भारतात आलो आणि लग्न झाल्यावर अमेरिकेला परतत असताना सॅन फ्रॅन्सिस्को विमानतळावर मला अडवण्यात आले. माझी कसून तपासणी करण्यात आली. अमेरिकेला शिक्षणासाठी जर तुम्ही स्वखर्चावर जात असाल, तर तुम्हाला तुमचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत लागणार्‍या खर्चाची रक्कम आपल्या बँक खात्यात ठेवावी लागते. माझ्या अमेरिकेतील खात्यात एक महिना पुरेल इतकी रक्कम होती आणि भारतातील बँक खात्यात उर्वरित रक्कम होती. भारतातील बँक खाते पडताळण्याची आम्हास परवानगी नाही, त्यामुळे अमेरिकेतील वास्तव्यास माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत असे सिद्ध करून त्यांनी माझा प्रवेश नाकारला आणि अमेरिकेत पाच वर्षे प्रवेशबंदी केली. अमेरिकेत पुढील संशोधनावर काम करून त्यासाठीची कंपनी सुरू करण्याच्या माझ्या स्वप्नावर अचानक पाणी फेरले गेले. ही घटना मी आणि माझ्या कुटुंबियांसाठी धक्कादायक होती. यावेळी माझे आईवडील, मित्रमंडळी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी मला धीराने साथ दिली. असा बाका प्रसंग जेव्हा येतो त्यावेळी खरी गरज असते भक्कम आधाराची. माझे पालक नेहमीच माझ्यासाठी उत्तम मार्गदर्शक आणि मित्रसुद्धा आहेत. प्रत्येक उद्योजकाला अशा आधाराची गरज असते. याचमुळे या अन्यायाच्या विरोधात मी लढा दिला. अमेरिकेतील इमिग्रेशन कोर्टमध्ये फिर्याद नोंदवली. दोन वर्षे केस लढली. अखेर माझ्यावरची बंदी हटवली गेली. आता मी कधीही नवीन विझा घेऊन अमेरिकेत जावू शकतो. अडचणी प्रथमेशचा पाठलाग सोडत नव्हत्या, परंतु तो म्हणतो, “आयुष्यात अडचणी आल्यावर जर तुम्ही निराश झालात आणि उद्योजकता सोडून दिली तर तुम्ही मुळात उद्योजकच नव्हतात. कारण जगातील प्रत्येक उद्योजकासमोर अडचणी ह्या येतातच. त्यावर मात करून पुढे जाता आले पाहिजे.” प्रथमेशला अमेरिकेकडून पेटंट मिळाले. अमेरिकेतून परतल्यावर आता काय करायचे हा विचार सतत चालू होता. पुन्हा नोकरी करणार नाही हे ठाम होते. परंतु उदरनिर्वाहासाठी काही तरी केले पाहिजे. त्यावेळी माझ्या मामांनी माझ्यातील सोशल मीडियाच्या आवडीलाच उद्योगात रुपांतरीत करण्यात सल्ला दिला. मग मी ऑनलाईन प्रशिक्षण, विविध कोर्स करून डिजिटल मार्केटिंगमध्ये अधिक ज्ञान मिळवायला सुरुवात केली आणि त्याविषयी अभ्यास करत राहिलो. २०१७ साली त्याने स्वत:ची ‘फोकस मिडीयम सोल्युशन्स’ नावाची डिजिटल मार्केटिंग कंपनी सुरू केली. ज्याद्वारे विविध कंपन्यांना ते डिजिटल मार्केटिंगची सेवा पुरवतात. २०१८ साली ‘360 टूर बॉक्स’ ही कंपनी निलेश काठे या मित्रासोबत भागीदारीत सुरू केली. व्यवसायासाठी ३६० अंशातील फोटो काढून ते सोशल मीडिया, वेबसाईट आणि मॅप्स आणि virtual reality चे प्रोजेक्टमध्ये टाकले जातात. ते गूगलचे अधिकृत पार्टनरसुद्धा आहेत. २०१८ मध्येच ऑनलाईन ‘इ-कॉमर्स’मध्ये सॉफ्टवेअर बनवण्यास सुरुवात केली. त्यासाठी प्रथमेशने अमेरिकेमध्ये ‘किक टेक बॉक्स’ नावाची कंपनी सुरू केली. ह्यामध्ये इ-कॉमर्स मार्केटिंगवर सॉफ्टवेर आणि सर्व्हिसेस दिले जाते. याशिवाय ‘मराठी तरुण आणि उद्योजकांसाठी, “शिका डिजिटल मार्केटिंग मराठीमध्ये” हा उपक्रम सुरू केला आहे. ह्यामध्ये मराठी आणि भारतातील उद्योजकांना सोप्या शब्दात डिजिटल मार्केटिंगची ओळख करून दिली जाते. यामध्ये मराठी भाषेत ऑनलाइन कोर्स आणि मराठी ई-बुक्स अगदी वाजवी दरात उद्योजकांना उपलब्ध करून दिले आहेत. marathidigitalbox.com इथे अधिक माहिती मिळवू शकता. सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. प्रत्येक उद्योजकाला सुरुवातीचा काळ भरपूर कठीण असतो. आपल्या देशात कॉम्प्युटर इंजिनिअरींग क्षेत्रातील उद्योजकांविषयी असणारी मानसिकता खूप उदासीन आहे. सुरुवातीच्या काळात एका सुप्रसिद्ध कंपनीतून आम्हाला फोन आला. आम्ही त्यांच्यासोबत मिटिंगसाठी गेलो. वरिष्ठांशी चर्चा करून सॉफ्टवेअरची आखणी वगैरे बोलणी झाली. त्यानंतर त्यांच्या सीईओंना भेटण्यास सांगितले. आम्ही केबिनमध्ये गेल्यावर त्या व्यक्तीने इतरत्र फोन करून बोलण्यात दहा मिनिटे वेळ घालवला. त्यानंतर म्हणाले, आम्हाला जसे हवे तसे सॉफ्टवेअर बनवून द्या. आम्ही एक महिना वापरून पाहतो आणि त्यानंतर जर आवडले तर तुमचे जे काही चार-पाच हजार असतील ते घेवून जा. आपल्याला कोणी तरी कानशिलात मारली असा मला आणि माझ्या मित्राला अनुभव आला. त्यावेळी आम्ही त्या सीईओंना म्हणालो, “तुमच्या दुकानात आलेला एखादा ग्राहक जर असं म्हणाला की, मी सोन्याचा हार घेऊन जातो, एक महिना वापरून पाहतो आणि नाही आवडला तर परत देतो.” व्यवसाय आमचा आहे, ग्राहकाकडून किती पैसे अॅडव्हान्स घ्यायचे, किती महिने सेवा द्यायची या सगळ्या गोष्टी आम्ही ठरवू. आमचा ग्राहक तुम्ही ठरवू शकत नाही. आपल्या उद्योगाची तत्त्व, मूल्य आपण ठरवली पाहिजेत. त्या दिवसानंतर आमचे ग्राहक आम्हीच निवडतो, समोरची व्यक्ती प्रोफेशनल असेल तरच आम्ही करार करतो. म्हणून प्रथमेश म्हणतो, “आपला ग्राहक स्वत: निवडण्याचे सामर्थ्य तुमच्यात ठेवा. फक्त पैश्यासाठी काम करू नका.” उद्योगात जसे ठरवतो तसेच घडेल असे होत नाही. नशीब, भौगोलिक गोष्टींची साथही मिळावी लागते. आजही सहा वर्षे झाली तरीही माझे भारतातील पेटंट माझ्या नावावर नाही. यासाठी सरकारी यंत्रणेतील संथपणा, संशोधनावरील उदासीनता या गोष्टी कारणीभूत आहेत. म्हणून मी हार मानलेली नाही. त्या व्यवसायाला बाजूला ठेवून मी नवीन संधी शोधली. आपण जे करतो त्यात इतरांपेक्षा काहीतरी वेगळेपण असावे लागते तरच त्याकडे ग्राहक आकर्षित होतो. डिजिटल मार्केटिंग ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे आम्ही ग्राहकाला प्रत्येक गोष्टीची माहिती देतो त्याचसोबत त्याला प्रशिक्षणही देत असतो. आपण लहानपणी बघिलतलेल्या स्वप्नांचा आपण प्रत्यक्षात पाठपुरावा करता आणि ते करत असताना मिळणारे मानसिक समाधान आणि आनंद ही माझ्या उद्योजकीय जीवनातील सर्वात मोठी उपलब्धी आहे. जगाच्या पाठीवर कोठेही असलो तरी मला माझे उद्योग चालवता आले पाहिजे आणि भारतातील उद्योजकांना आणि तरुणांना डिजिटल मार्केटिंगचे महत्त्व पटवून त्यांना अधिकाधिक उद्योगात यश मिळवून देणे हे माझे ध्येय आहे. या पाच वर्षांत एक लाख उद्योजकांशी जोडले जाण्याचा प्रथमेशचा संकल्प आहे. संपर्क : ९१३००४५३३३ Email: prathamk7@gmail.com Website: www.iampratham.com

सविस्तर वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://wp.me/p4g3S9-3Qi


19 मे

  .