गुरुवार, २१ डिसेंबर, २०१७

आणि भारत सज्ज झाला.....
​14 महिन्याचं लेकरू कडेवर घेऊन ,​
​आपल्या 5 वर्षांच्या मुलीला हाताने ओढत,​
​7 वर्षाच्या मुलीच्या कडेवर बसलेल्या​
​3 वर्षाच्या मुलीला बिस्किटाचा घास भरवत,​
​ती 6 महिन्यांची पोटुशी माऊली,​
​अनवाणी पायाने, 'यावेळी मुलगाच होऊ दे!',
असा नवस बोलण्यासाठी मंदिरात आली..!!​
आणि भारत महासत्ता बनण्यासाठी सज्ज झाला!
​गळ्यात ताईत आणि मनगटाला गंडा बांधला,​
​नाकात दोन दोन थेंब टाकून, 
परातीतल्या पाण्यात हात बुडवून, कावीळ उतरवली,​
​आणि सापाचे विष उतरवण्यासाठी मांत्रिक गाठला!​
आणि भारत महासत्ता बनण्यासाठी सज्ज झाला!
​मुलीच्या लग्नात 10 तोळे सोने आणि 
लाख भर हुंडा शेत विकून दिला, 
शिवाय तिचं बाळंतपण सुद्धा केलं!​
​बाळाच्या जावळाला बोकड कापून जेवणावळी घातल्या!​
आणि भारत महासत्ता बनण्यासाठी सज्ज झाला!
​बाई कमावते, नवरा दारूत उडवतो, 
रात्री पायाखाली तुडवतो.​
​तरीही वंशाचा दिवा हवा म्हणून 
सासू रुसून बसली!​
आणि भारत महासत्ता बनण्यासाठी सज्ज झाला!
​नापिकीला कंटाळून बाप हवालदिल झालाय! 
तंगड्या वर करून बसलेल्या मुलाच्या 
मोबाईलचा रिचार्ज संपलाय! 
हळदीला डीजे नाही आणला तर 
लग्न नाही करणार म्हणते धाकटी मुलगी!​
​नांदवायचं नाही म्हणताहेत सासरचे,
 म्हणून घरी आली मोठी मुलगी..!!​
आणि भारत महासत्ता बनण्यासाठी सज्ज झाला!
​नव्या गाडीच्या नंबर प्लेटला  लिंबू मिरची बांधली,​
​राहत्या घरातले स्वयंपाकघर पूर्वेचं पाडून पश्चिमेला बांधलं,​
​नावाच्या स्पेलिंगमध्ये एक्सट्रा लेटरही जोडून घेतलं​
​आता कुठे पोरगा बिनपगारी मास्तर 
म्हणून नॉन ग्रांट च्या शाळेत लागला​

आणि भारत महासत्ता बनण्यासाठी सज्ज झाला!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

19 मे

  .